दिल्ली सेवा विधेयकावर भाजपची रणणिती; लोकसभेतील खासदारांना व्हीप जारी
सध्या विरोधक एकवटले आहेत. तर त्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीचा अधिकार हा दिल्ली सरकारला असल्याचं न्यायालयाने म्हणत निर्णय दिल्ली सरकारच्या बाजूने दिला होता.
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सरकारच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या दिल्ली सेवा विधेयकावरून देशात जोरदार वादंग होत आहे. यावरून सध्या विरोधक एकवटले आहेत. तर त्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीचा अधिकार हा दिल्ली सरकारला असल्याचं न्यायालयाने म्हणत निर्णय दिल्ली सरकारच्या बाजूने दिला होता. त्यावरून आता सत्ताभारी भाजप आणि विरोधकांत वाद होत आहे. यावरूनच आता दिल्ली सेवा विधेयक मंगळवारी लोकसभेत सादर करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या वतीनं केंद्रीय मंत्री नित्यानंद राय ते मांडलं. त्याच्यावर आज मतदान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी याच्याआधीच आपच्या खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. तर आता मतदान होण्याच्या शक्यतेनं भाजपकडून देखील खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.