हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची उघड नाराजी
एकीकडे कालच महायुतीतील शिवसेनेने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात हातकणंगले येथून धैर्यशील माने यांना तिकीट दिले आहे. परंतू हा मतदार संघ भाजपाकडे असावा अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. आता भाजपा कार्यकर्त्यांनी धैर्यशील माने यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. समाजमाध्यमात मानेंविरोधात लिखाण केले आहे.
हातकणंगले : महायुतीतील शिवसेनेचे हातकणंगले येथील उमेदवार धैर्यशील माने यांच्यावर भाजपाचे कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. मागील एका कार्यक्रमातील धैर्यशील माने यांनी कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे कौतूक करणारे वक्तव्य केले होते. याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर भाजपा कार्यकर्त्यांकडून पसरविला जात आहे. त्यामुळे सर्व पक्षांशी चांगले संबंध ठेवण्याचा धैर्यशील माने यांचा प्रयत्न टीकेचे कारण बनला आहे. या कार्यक्रमात धैर्यशील माने यांनी स्टेजवर ‘जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटलांना दुखवून चालत नाही’ असे सतेज पाटील यांचे कौतूक केले होते.. हे आजही आम्ही कोणी विसरलेलो नाही. आज भाजपाची मदत घेऊन उद्या कॉंग्रेसच्या नेत्याचं गुणगान गाणार असाल तर येथून पुढे चालणार नाही असा इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना दिला आहे. महायुतीतील सहभागी आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे यांनी देखील हातकणंगले येथून उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने धैर्यशील माने यांची निवडणूक अवघड बनली आहे.