Dadar Kabutar khana : कबुतरांना धान्य, दाणे टाकण्याचा मोह आवरा, नाहीतर पडणार महागात, BMC चा निर्णय काय?
भूतदया म्हणून प्राण्यांना, पक्ष्यांना अन्न खाऊ घालत असाल तर यापुढे पालिका तुम्हाला ५०० रुपये दंड करणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ हे सध्या लागू आहेत. या उपविधीमध्ये कालसुसंगत तसेच विविध शासकीय, प्रशासकीय बदल करून नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यात रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी प्राणी पक्ष्यांना खाऊ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
तुम्ही कबुतर किंवा पक्षीप्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही कबुतरांना दाणे टाकतात का? टाकत असाल तर जरा जपूनच… कारण कबुतरांना दाणे टाकल्यास आता ५०० रूपये दंड आकारला जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून कबुतरांना दाणे, अन्न खायला दिल्यास ५०० रूपये दंड वसुल केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या नव्या नियमावलीत ही तरतूद कायम आहे. दरम्यान, येत्या काळात पालिका प्रशासनाकडून कबुतरांना दाणे, अन्न खायला घातल्यात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कबुतर, कुत्री, मांजरी, गायी यांना सार्वजनिक ठिकाणी कोणी खाऊ घालत असाल आणि त्याचा इतरांना त्रास होत असेल तर अशा प्रकरणात ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर येथील कबुतरखाना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच इतरत्रही अनेक ठिकाणी कबुतरांना दाणे घालून अनधिकृत कबुतरखाने सुरु झाल्याबद्दल नागरिक समाजमाध्यमावर संताप व्यक्त करत असतात. मांजरीना, श्वानांना रस्त्यावर खाऊ घालणाऱ्यांवरूनही अनेकदा वाद होत असतात.
