बीआरएसने फसवणूक केलीय, महाराष्ट्राचा सह्याद्री अडचणीत म्हणून…; राष्ट्रवादीच्या प्रवेशावर बांगर यांची प्रतिक्रिया
तेलंगणा राज्यातील बीआरएस पक्षाने आपले हात पाय आता महाराष्टात पसरवण्यास सुरूवात केली आहे. सोलापूर, सांगली येथे मोठ्या नेत्यांचे पक्ष प्रवेश झाले आहेत. त्याचदरम्यान बीडमध्ये मात्र एका नेत्याने बीआरएसवर आरोप करत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड : 17 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीड येथे सभा होत आहे. त्यांची मराठवाड्यात ही पहिली सभा होत असून राज्यात दुसरी सभा होत आहे. यावेळी या सभेत काही नेते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर यावेळी प्रवेशाच्या आधी त्या नेत्याने थेट बीआरएसवरच आरोप केले आहेत. बीआरएस नेते शिवराज बांगर यांनी हे आरोप केले असून त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बांगर यांनी, बीआरएस पक्षाने आमची फसवणूक केली. जे सांगून प्रवेश घेतला, तसं तिथं काही मिळालं नाही. तेथे काहीही व्हिजन नाही. त्यामुळे अनेक नेते पक्ष सोडणार आहेत. मराठवाड्यातील अनेक नेते पक्ष सोडणार आहेत. बीआरएस ही भाजपची बी टीम असल्याची टीका देखील बांगर यांनी केली आहे. तर महाराष्ट्राचा सह्याद्री अडचणीत आहे, म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश करतोय असे देखील त्यांनी म्हटलं आहे. तर आपण जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात असून संदीप क्षीरसागर यांचं समर्थन करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.