पाकिस्तानविरोधात गुरगुरणारे मोदी सरकार चिनी ड्रॅगनपुढे मौनात का जाते?; सामनातून हल्ला
वेगवेगळ्या माध्यमातून अरुणाचल प्रदेशवर कब्जा करण्याचा प्रयत्न चीन करत आहे. त्याला 'झांगवान' नाव देत 11 गावांची नावे देखील बदलण्याच्या तयारीत चीन आहे.
मुंबई : केंद्र सरकारवर दैनिक सामनामधून पुन्हा एकदा हल्लाबोल करण्यात आला आहे. यावेळी सामनातून अरुणाचल प्रदेशवरून मोदी सरकारवर निशाना साधण्यात आला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून अरुणाचल प्रदेशवर कब्जा करण्याचा प्रयत्न चीन करत आहे. त्याला ‘झांगवान’ नाव देत 11 गावांची नावे देखील बदलण्याच्या तयारीत चीन आहे. त्यावर मात्र मोदी सरकार फक्त निषेध म्हणत कागदी बाण सोडत आहे. त्यामुळेच चीन अरुणाचलबाबतचा त्यांचा अजेंडा पुढे रेटत आहे. पाकिस्तानविरोधात गुरगुरणारे मोदी सरकार चिनी ड्रॅगनपुढे मौनात का जाते? चीनची दादागिरी आणि हिंदुस्थानची मौनगिरी कधी संपणार? असे प्रश्न जनतेला पडले आहेत. त्यांची उत्तरे देण्याचे धाडस केंद्र सरकार दाखवू शकेल का? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.