एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “मी जबाबदारीने सांगतोय की…”
अजित पवार युतीत सामील झाल्यामुळे शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे. अजितदादांच्या एन्ट्रीने एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.
मुंबई : अजित पवार युतीत सामील झाल्यामुळे शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे. अजित पवार सुद्धा आपल्यासोबत 40 आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आले आहेत. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. “यापूर्वीच देवेंद्रजींनी आणि आमच्या शीर्ष नेतृत्वाने आणि अजित दादांनी हे मान्य केलं आहे की, 2024 पर्यंत आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तेच राहणार आहेत. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही.या कपोल्कल्पित मुख्यमंत्री बदलण्याबद्दल आणि राज्यात संभ्रम निर्माण करण्याबद्दल जे वातावरण तयार करत आहेत, ते केवळ राज्यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. मी जबाबदारीने सांगतोय की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील, यात कोणीही गैरसमज करु नये,” असं बावनकुळे म्हणाले.