‘कुणाशीही वाद नाही… मी कुणाला घाबरत नाही…’, छगन भुजबळ असं का म्हणाले?
राज्यातील वातावरण तापले आहे. आतापर्यंत शांतपणे सुरु असलेल्या मराठा आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. आमदार, मंत्री, नेते यांच्या घरावर हल्ले होत आहेत. यातच मंत्री छगन भुजबळ यांची सुरक्षा सरकारने वाढविली आहे. मात्र, मंत्री भुजबळ यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केलीय.
मुंबई | 31 ऑक्टोंबर 2023 : राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचा निर्णय घेतला. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. राज्य सरकारची जर मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका असेल तर त्यासाठी समिती नेमली आहे. ती समिती योग्य तो अहवाल देईल. आम्ही त्याची वाट पाहू मग भूमिका घेऊ. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं ही सरकारची भूमिका आहे. राज्यातील वातावरण शांत राहण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करत आहे. अनेक लोकांना उचकाविण्याचे काम केलं जात आहे. जरांगे पाटील स्वतः म्हणतात मला शांतता हवी. पण काही विरोधक आहेत ते माझ्याबाबत चुकीचे संदेश पोहोचवत आहेत. कॅबिनेट बैठकीमध्ये आमची चर्चा झाली आहे, खंडाजगी वैगरे असे काही झाले नाही. कुणाशीही वाद झाला नाही. राज्यात नेत्यांवर हल्ले होत आहेत म्हणून सरकारने सुरक्षा वाढवली आहे. पण, मी कुणाला घाबरत नाही, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.