“तुम्ही कुठे कुठे माफी मागणार”, छगन भुजबळ यांचा शरद पवार यांना टोला
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिकच्या येवल्यामध्ये काल जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं.
नाशिक : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाशिकच्या येवल्यामध्ये काल जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले की, “पवार साहेब सभेत म्हणाले मी माफी मागतो. उमेदवारी देऊन माझी चुक झाली. शरद पवार यांना माफी मागावी लागेल असं मी कोणतंही काम केलं नाही. मला उमेदवारी दिल्याने येवला मतदारसंघाचा विकास झाला आहे. 2004 मध्ये मी येवल्यातून निवडणूक लढवली, तेव्हा येवल्याचे लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी या मतदारसंघाचा विकास झालेला नाही. त्यामुळे तुम्हे येवल्याला या, अशी विनंती केली होती. माझ्यापुढे जुन्नरसह विविध मतदारसंघांचा पर्याय होता. आता या मतदारसंघाचा विकास झाला आहे, त्यामुळे चार वेळा मतदारांनी मला निवडून दिले आहे, त्यासाठी माफी मागण्याचा काहीच विषय नाही. तुम्ही कुठे कुठे माफी मागणार”