“रोहित पवार यांना राजकारणाचं ज्ञान किती? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले…”, छगन भुजबळ यांची टीका
अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.
पुणे: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. रोहित पवार यांच्या आरोपांनंकप छगन भुजबळांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, “आमदार रोहित पवार यांना राजकारणाचे ज्ञान किती आहे, हा प्रश्न आहे. त्यांना हे माहिती नाही की, ते आईच्या उदरात होते, त्यावेळी मी मुंबईचा आमदार आणि महापौर होतो. ते पाच वर्षांचे होते, त्यावेळी मी महसूल मंत्री होती. रोहित पवार 10 वर्षांचे होते त्यावेळी मी काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेता होतो. शिवसेना-भाजप विरोधात लढत होतो. ते 15 वर्षांचे होते तेव्हा मी पक्षाचा प्रांत अध्यक्ष झालो होतो, त्यावेळी मी शरद पवार यांच्याबरोबर होतो. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापना केली. रोहित पवार याला अजून राजकारणाची माहिती नाही. त्यांना अजून पूर्ण समज आली नाही. रोहित पवारांसारखा मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. त्यांना वाडवडिलांचे पाठबळ होते. माझे गॉड फादर कोणीच नव्हते.”