खैरे यांचे चारआने सरकलेले म्हणत भाजप नेत्याचा पलटवार; अंबादास दावनेंवरही टीका
अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या या टीकेला भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे
छत्रपती संभाजीनगर : येथील किऱ्हाडपुर भागातील राम मंदिर परिसरात जोरदार राडा झाला. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या राड्यामागे भाजप एमआयएमचा हात असल्याचा आरोप केला. तर उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीमागे देवेंद्र फडणवीस हेच मास्टरमाईंड आहेत, असा गंभीर आरोप केला. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या या टीकेला भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. त्यांनी, खैरे यांचे चारआने सरकलेले आहेत. त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा असा टोला कराड यांनी खैरे यांना लगावला आहे. त्यामुळे किऱ्हाडपुर भागात झालेल्या दंगलीवरून आता राजकारण चांगलेच तापलेलं दिसत आहे.