‘ते’ मॉरिशसला गेलेत. पण जाताना मोगलाईनचे आदेश देऊन गेलेत; फडणवीस यांच्यावर राऊत यांचा घणाघात
त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला ते मॉरिशसला गेलेत पण मोगलाईनचे आदेश देऊन गेलेत असा घणाघात केला आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा थेट मॉरेशियसमध्ये उभारण्यात आला आहे. त्याचे आनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित पार पडणार आहे. यासाठी ते मॉरेशियसला गेले आहेत. तर इकडे राज्यात बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून (Barsu Refinery Project) चांगलेच राजकारण तापलेलं आहे. आंदोलकांवर आणि ग्रामस्थांवर लाठीचार्ज होत आहे. अश्रुधुराच्या नळकांडया फूटत आहेत. आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला ते मॉरिशसला गेलेत पण मोगलाईनचे आदेश देऊन गेलेत असा घणाघात केला आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, शिवरायांच्या भूमीमध्ये निरापराध लोकांना पकडून मारलं जात आहे. त्यांचा आवाज दाबला जात आहे. महिलांना केस धरून फरफटत नेलं जात आहे. आणि हे तिकडं गेलेत. शिवरायांच्या महाराष्ट्रात किंकाळ्या फुटत असताना शिवसेना हे सहन करणार नाही. ज्या कोकणपट्ट्यानं शिवसेना वाढवली, उभी केली, टिकवली. त्या कोकणी जनतेवरचा हा अत्याचार शिवसेना सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.