माफी मागा, फडणवीस मोठ्या मनाचे; भाजपच्या मोठ्या नेत्याचे ठाकरेंना आवाहन
ठाकरे तुम्ही चूक केली, फडणवीस घराणं फक्त सुशिक्षितच नाही तर संस्कृत देखील आहे. विचार न करता उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत फेसबूकवर पोस्ट केल्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे यांच्यावर शिंदे गटासह भाजमधील नेत्यांनी टीका केली. याच मुद्द्यावरून ठाकरे यांनी आपले शब्द जपून वापरावेत, असे भाजप नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ठाकरे यांनी माफी मागावी, फडणवीस मोठ्या मनाने त्यांना माफ करतील असंही पाटील यांनी म्हटलं आहे. ठाकरे तुम्ही चूक केली, फडणवीस घराणं फक्त सुशिक्षितच नाही तर संस्कृत देखील आहे. विचार न करता उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी. तर राज्यातील सध्याच्या खालच्या पातळीवरील राजकारणामुळं मन विधीर्ण झाल्याचेही पाटील म्हणाले.