‘मागून येणाऱ्या आणि इंजनच्या ड्रायव्हरचीच खरी मजा’; शिंदे-फडणवीस-पवार यांच्यावर काँग्रेस नेत्याचा टोला
राज्यातील सत्तेत शिंदे-फडणवीस सरकार असून आता यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश झाला आहे. यावरून शिंदे गट आणि भाजपमधील काही नेत्यांमध्ये नाराजी आहे.
नागपूर : राज्यातील सध्याच्या सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राज्यातील सत्तेत शिंदे-फडणवीस सरकार असून आता यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश झाला आहे. यावरून शिंदे गट आणि भाजपमधील काही नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ब्रेक लागल्याने ही नाराजी जनतेच्या समोर आली आहे. यावरूनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला टोला लगावला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन इंजनचं सरकारला टोला लगावत या सरकारला तीन इंजन असून देखील याला डब्बे नाहीत, ना मागे पब्लिक अशी टीका केली आहे. यावेळी त्यांनी टीका करताना, या सरकारमध्ये मागून येणाऱ्यांना स्थान दिलं जातं. त्यामुळे सध्या त्यांची मजा आहे. तर इंजनच्या ड्रायव्हरची देखील मजा पहायला मिळत आहे. त्यांच्या इंजनला डब्बे नाहीत तर मागे पब्लिक नाही अशी अवस्था या लोकांची झाली आहे अशीही टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.