मविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं?…मात्र नवीन नाटक रंगलं? काय फुटीची ठिणगी पडली?
आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं. त्यावरून आता महाविकास आघाडीतच ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
मुंबई : जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं. त्यावरून आता महाविकास आघाडीतच ठिणगी पडल्याचे दिसत आहे. तर त्यांच्या या वक्तव्यावर आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने पलटवार केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांच्या या वक्तव्यावर बोलताना, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आमची परंपरा आहे. कोणी गर्व करावा हा त्यांचा अधिकार आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे म्हटलं आहे. तर याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ आहे? कोण लहान भाऊ आहे?, हे पाहण्यासाठी आता डीएनए टेस्ट करावी लागेल. अजित दादा काय म्हणतात किंवा कोण काय म्हणतो, याला जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अशा भूमिका घ्यावा लागतात. महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम आहे. आधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे आधी लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा करायला हवी. त्यामुळे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायच्या आधिच अशा प्रकारे आघाडीत धुसफूस पहायला मिळत आहे. तर यामुळे राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.