स्वतःवर वार करुन घेत हल्ल्याचा बनाव, बनवेगिरी उघड, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
उल्हासनगरात एका मंदिराच्या पुजाऱ्यानं स्वतःच स्वतःवर वार करून घेत आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव रचला. या घटनेच्या तपासादरम्यान पुजारी हाच आरोपी असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं या पुजाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्यायत.
उल्हासनगरच्या (Ulhasnagar) कॅम्प ५ मध्ये मोमबत्तीवाला गणपती मंदिर असून तिथे २२ वर्षीय वरुण लुल्ला हा पुजारी (Pujari) म्हणून काम करतो. मंगळवारी ८ मार्च रोजी रात्री तो त्याच्या एका मित्रासोबत कुर्ला (Kurla) कॅम्प रोडवरून दुचाकीने जात असताना तुटलेल्या पुलाजवळ त्याचा मित्र लघुशंकेला गेला आणि तितक्यात एका दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी आपल्या पोटावर आणि पाठीवर वार केले, असा बनाव वरुण लुल्ला याने रचला. वरुण याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करत पोलिसांनी तसा गुन्हाही दाखल केला. मात्र या प्रकरणात पोलिसांना काहीतरी संशयास्पद वाटत असल्यानं हल्ल्याच्या वेळी वरुणसोबत असलेल्या त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी वरुण याने स्वतःच स्वतःवर वार करून घेतल्याची माहिती या मित्राने पोलिसांना दिली. त्यानुसार वरुण याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेही घरगुती वादाला कंटाळून आपणच हा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार आता फिर्यादी वरुण लुल्ला यालाच आरोपी म्हणून अटक करण्यात आल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्षण सारीपुत्र यांनी दिली आहे.