बिपरजॉय चक्रीवादळाची धोक्याची घंटा; सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट
चक्रीवादळाची वाढती तीव्रता पाहता भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याआधी हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट दिला होता. पण चक्रीवादळाची तीव्रता वाढताना दिसत आहे, त्यामुळे हवामान विभागाने किनारपट्टी भागातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढताना दिसत आहे. हे चक्रीवादळ आता गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. तर चक्रीवादळाची वाढती तीव्रता पाहता भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याआधी हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट दिला होता. पण चक्रीवादळाची तीव्रता वाढताना दिसत आहे, त्यामुळे हवामान विभागाने किनारपट्टी भागातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे येथे एनडीआरएफची आणि कोस्ट गार्ड हे अलर्टवर आले आहेत. बिपरजॉय आता हळूहळू पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकत आहे. पण याआधी ते पाकिस्तानकडे सरकेल असे सांगण्यात येत होते. मात्र आता त्याची दिशा बदलली आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने बिपरजॉय चक्रीवादळाविषयी धोक्याचा इशारा दिला आहे. तर 15 जूनपर्यंत हे चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजस्थानच्या अनेक भागात वादळा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कच्छमधील कोटेश्वर महादेव मंदिर आणि नारायण सरोवर हे बंद करण्यात आलं आहे.