‘कांदा निर्यात शुल्कात वाढ! मोदी सरकारचे ‘खायचे दात’, जनताच हे दात त्यांच्याच घशात घालील’; सामनातून टीका
राज्यातील जनता ही माहागाईने त्रस्त झाली आहे. तर बळीराजा हा त्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने. त्यातच आता कांद्याच्याबाबत केंद्राने अन्याय कारक निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच संतापला आहे.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | कांद्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेत अनेकांना धक्का दिला. तर या धक्कादायक निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतापले असून त्यांच्याकडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय. तर कांदा बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. यावरूनच ठाकरे गटाचं मुख पत्र असणाऱ्या दैनिक सामनातून घणाघाती टीका करण्यात आली आहे. सामनातून केंद्रावर निशाना साधताना, टोमॅटोने गेल्या महिन्यात 200 रुपयांचा आकडा पार केला होता. उद्या कांद्यानेही त्याच्याच पावलावर पाऊल टाकले तर आधीच महागाईत होरपळणारी जनता तोंडावर आलेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्तापक्षावर ‘मतबंदी’ची कुऱ्हाड चालवेल. ही मोदी सरकारची खरी धास्ती आणि भीती आहे. कांद्याचे निर्यात शुल्क तब्बल 40 टक्के वाढविण्याचा निर्णय तडकाफडकी याच भीतीतून घेतला गेला आहे. दरवाढ नियंत्रण आणि जनतेचे हित वगैरे दाखवायचे दात आहेत. सामान्य कांदा उत्पादकाच्या पोटावर मारलेली निर्यात शुल्क वृद्धीची लाथ हे मोदी सरकारचे ‘खायचे दात आहेत. निर्णयत्रस्त बळीराजा आणि महागाईग्रस्त जनता उद्याच्या निवडणुकीत सत्तापक्षाचे हे दात त्यांच्याच घशात घातल्याशिवाय राहणार नाही.