Ajit Pawar News : तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; लाडकी बहीणवरून अजितदादांचा विरोधकांना जोरदार टोला
DCM Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लाडक्या बहीणींचा हप्ता 2100 रुपये करण्यावरून त्यांनी विधानसभेत भाष्य केलं.
आम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. जाहीरनामा पाच वर्षासाठी असतो. आम्ही कधीही असं म्हंटलं नाही की आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नसल्याची टीका विरोधक करत आहे. त्यावरून आज अजित पवार यांनी विधानसभेत विरोधकांना उत्तर दिलं आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, तुमच्यातलेच काही लोक ही योजना बंद करा म्हणून कोर्टात गेले होते. हा चुनावी जुमला आहे, असं म्हणत होते. पण आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देत आहोत. होळीच्या दिवशी देखील लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या बहिणींसाठी आहे. मात्र या योजनेत ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्या बहिणींचा देखील समावेश झाला असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे, त्यात सुधारणा केली जाईल. आम्ही कोणत्याही बहिणीकडून पैसे परत घेणार नाही, असंही यावेळी बोलताना अजित पवार यांनी म्हंटलं आहे.