Ajit Pawar : बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
Ajit Pawar On Beed Tour : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजित पवारांनी बीडच्या भाऊदादांना चांगलाच दम दिलेला आहे.
जिल्ह्यात मागच्या तुलनेत कामाचा स्पीड वाढलेला आहे. पण रस्ते मंजूर करून नुसती बिलं काढेल त्याला मी नाही मातीत घातला तर बोला, असा दम बीड जिल्ह्यातील ठेकेदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजित पवारांनी जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर भाष्य करताना सगळ्यानाच चांगला दम भरला आहे. त्यामुळे दादांच्या दादागिरीचा रोख नेमका कोणाकडे होता? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात राख, वाळू, भूमाफिया अशा गँग वाढल्या आहेत. पण या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करायचं आहे. त्याला आता पर्याय नाही. बीड जिल्ह्यात विविध विकासकामांना मी निधी देणार आहे. पण स्कॉड पाठवून या कामांची पाहणी सुद्धा करण्यात येणार आहे. चुकीचं काम करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाईल, असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.