दिपाली सय्यद यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टीका करणं पडलं महागात; गुन्हा दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याने दिपाली यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई- अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद पंतप्रधान नरेंद्र मोदींवर(PM Narendra Modi) आक्षेपार्ह भाषेत टीका करणं चांगलंच महागात पडलं आहे. दिपाली सय्यद यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर (social media )चांगलंच व्हायरल झालं होतं. भाजपमध्ये (BJP) घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली होती. “किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल”, असं त्यांनी म्हटलं होतं.पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याने दिपाली यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.