‘जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार’; तर आगीचे कारण ही फडणवीस यांनी उलगडले
त्यात बसला आग लागून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बसचा अपघात कशाने झाला हे सांगताना जखमींच्या प्रकृती बाबत आणि शोक व्यक्त करणारं ट्विट केलं आहे.
मुंबई : विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बसचा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरात पिंपळखुटा येथे झाला. त्यात बसला आग लागून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बसचा अपघात कशाने झाला हे सांगताना जखमींच्या प्रकृती बाबत आणि शोक व्यक्त करणारं ट्विट केलं आहे. त्यांनी यावेळी, विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. तर प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका दुभाजकाला आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागल्याचे त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर पिंपळखुटा येथे खाजगी बसच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून वाहनचालकाची सुद्धा चौकशी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपघातस्थळी भेट देणार असल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे.