'मराठा आंदोलनात संभाजीनगर,पुणे.. वॉर रुम कोणी उघडली...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

‘मराठा आंदोलनात संभाजीनगर,पुणे.. वॉर रुम कोणी उघडली…,’ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

| Updated on: Feb 27, 2024 | 3:11 PM

मराठा समाजासाठी मी काय केले यासाठी मला कोणाच्या सर्टीफिकेटची गरज नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांच्याशी काही घेणं नाही. परंतू त्यांचा बोलविता धनी कोण ? यामागचे षडयंत्राचा छडा लावण्यासाठी एसआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे 10 टक्के आरक्षण स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मराठा समाजातील इतर कार्यकर्त्यांद्वारे त्यांची बदनामी सत्र सुरु झाले. त्यामुळे संतापलेल्या मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्राग्याच्या भरात सनसनाटी आरोप केले. त्यानंतर सरकारने संधी साधत त्यांची कोंडी करीत कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण 17 दिवसानंतर रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर आता विधीमंडळ अधिवेशनात मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण आहे हे शोधण्यासाठी एसआयटी नेमण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जरांगेंशी माझे काही देणेघेणे नाही. पण कोणाची आयमाय काढली जात असेल तर उद्या तुमच्या विरुध्द जरी कोणी बोलले तर मी विरोधकांच्या बाजूने उभा राहील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जरांगे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मराठा समाज माझ्या बाजूने उभा राहीला आहे. मराठ्यांसाठी मी मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण कोर्टात टीकले आणि मुख्यमंत्री पदी असेपर्यंत कोर्टातही टीकविले, सारथी संस्था, वसतीगृह, निर्वाह भत्ता मराठा तरुणांना दिल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात संभाजीनगर, पुणे, नवीमुंबईत वॉररुम कुठे होती. त्यांच्या घरात जाऊन कोण भेटले. दगडफेक करायला कोणी सांगितले हे सर्वकाही बाहेर येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Published on: Feb 27, 2024 03:10 PM