Navneet Rana : नवनीत राणा यांना कस्टडीत हीन वागणूक, वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही’ फडणवीसांचा आरोप!
नवनीत राणा यांना भायखळ्यातील कोठडीत ठेवण्यात आलं. शनिवार आणि रविवारची रात्र कोठडीत घालवलेल्या नवनीत राणा यांना कस्टडीत हीन वागणूक देण्यात आली
मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अटक (Navneet Rana Ravi Rana Arrest) करण्यात आली. त्यानंतर त्यांना कस्टडीमध्ये हीन वागणूक दिली गेली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिला होता. त्यानंतर मोठा गदारोळ मुंबईत पाहायला मिळाला. खार येथील राणा यांच्या निवासस्थानी शनिवारी शिवसैनिकांनी हल्लाबोल केला होता. दुपारी राणांनी मातोश्रीवर (Matoshree) न जाण्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर संध्याकाळी राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, नवनीत राणा यांना भायखळ्यातील कोठडीत ठेवण्यात आलं. शनिवार आणि रविवारची रात्र कोठडीत घालवलेल्या नवनीत राणा यांना कस्टडीत हीन वागणूक देण्यात आली, असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला.