“माझ्या ट्विटला चांगला प्रतिसाद, उद्धव ठाकरे यांनी आता समजून जावे,” देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर राजकीय संस्कृती खालवल्याची टीका इतर नेते करत आहेत. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगलं आहे. “देवेंद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपानंतर राजकीय संस्कृती खालवल्याची टीका इतर नेते करत आहेत. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे यांनी राजकीय संस्कृती कुठे जातंय याचा विचार करायला पाहिजे. मी काल एक ट्विट केलं त्याला मिळालेलं समर्थन पाहून मला असं वाटतं की आज पर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडणार आहे. त्याच्यावरून तरी उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला पाहिजे की लोकांना काय अपेक्षित आहे,” असं फडणवीस म्हणाले.