पंढरपूरच्या तुळशी वृंदावनातील संतांची मंदिरं धोक्यात; दोन महिन्यात दोन मंदिरे कोसळली? इतर मंदिरांचं काय?
आता त्यातील ही दोन मंदिरं पडल्याने वन विभाग खडबडून जागा झाला आहे. तर यानंतर खबरदारिचा उपाय म्हणुन इतर सर्व संतांची मंदिरे वनविभागाकडून उतरून घेण्यात आली आहेत.
पंढरपूर : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या पंढरपुरातील संतांचीच मंदिरं धोक्यात असल्याचे समोर आले आहे. येथे तुळशी वनात असणारी संत चोखामेळा (Sant Chokhamela) आणि संत एकनाथ महाराजांचे (Sant Eknath Maharaj) मंदिर दोन महिन्याच्या कालावधीत कोसळल्याने खळबळ उडाली होती. अवघ्या चार वर्षांपूर्वी बांधलेलं हे मंदिर कोसळल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत असून या प्रकारानंतर भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. तर विशेष बाब म्हणजे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mngantiwar) यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा होता. आता त्यातील ही दोन मंदिरं पडल्याने वन विभाग खडबडून जागा झाला आहे. तर यानंतर खबरदारिचा उपाय म्हणुन इतर सर्व संतांची मंदिरे वनविभागाकडून उतरून घेण्यात आली आहेत. खुद्द मंत्री मुनगंटीवार यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता संतांची मंदिरे उतरवण्यात आली आहेत. एक महिन्यानंतर होणाऱ्या आषाढी यात्रा सोहळ्यापूर्वी पुन्हा नव्याने तुळशीवनात संतांची मंदिरे उभारली जाणार का ? हा आता प्रश्न आहे. तर विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना पंढरपूरमध्ये एक अप्रतिम संत उद्यान पाहण्यास मिळावं यासाठी वन विभागाने पंढरपूरमध्ये सहा कोटी रुपये खर्च करुन तुळशी वृंदावन उभे केले होते.