लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी, वंचितचा समसमान 12 जागांचा फॉर्म्युला
महाविकास आघाडीत आगामी लोकसभेच्या जागा वाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 23 जागांची मागणी केली आहे. तर कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी 23 जागा थोड्या जास्त होतात. मग आम्हाला काय उरणार अशी भूमिका घेतली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांना समसमान अशा प्रत्येकी 12 जागांचा फॉर्म्युला आणला असल्याने आणखीनच आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई | 28 डिसेंबर 2023 : लोकसभेच्या निवडणूकांचे वेध सर्व पक्षांना लागले असून जागा वाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमधील विविध पक्षांमध्ये कलगीतुरा लागला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 48 जागांपैकी सर्वांना प्रत्येकी 12 – 12 जागांचा फॉर्म्युला मांडला आहे. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी 23 जागांची मागणी लावून धरली आहे. 23 जागा या थोड्या जास्त असून तुम्ही एकट्याने 23 जागा घेतल्यास कॉंग्रेसला काय उरणार असा सवाल कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे. सामंजस्याने प्रत्येकाला जागा दिल्यास एकमेकांसोबत उभे राहून भाजपाबरोबर लढता येईल असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. 2019 च्या भाजप युतीसोबत शिवसेनेने 23 जागा लढल्या होत्या. त्यामुळे ठाकरे गट 23 जागांवर ठाम आहे. जर 23 जागा ठाकरे गटाला दिल्यास राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला उरतात 25 जागा, त्यांचे समसमान वाटप केल्यास एकाला 12 तर एकाला 13 मिळतील. संजय राऊत यांनी दिल्लीत 23 जागा ठाकरे गटाला देण्याचे आश्वासन मिळाल्याचे म्हटले आहे. तर वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकाला समसमान 12 जागा मिळाव्यात असे पत्र कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहीले आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांच्या फॉर्म्युलावर महाविकास आघाडी काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.