मुसळधार पावसाचा मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना फटका, गुरुवारी राहणार बंद
कोकणात सततचा मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे कोकणातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर या पुढीलही तीन ते चार दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, 20 जुलै 2023 | कोकण, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. तर कोकणात सततचा मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे कोकणातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर या पुढीलही तीन ते चार दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगरातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना येथील शाळांना आज सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी, राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज आहेत. सकाळपासूनच मी मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाच्या संपर्कात आहे. कोणतीही आपत्ती आल्यास तातडीनं मदत व बचाव कार्य करण्यात यावी अशा सुचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगडमधील शाळांना आज गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाची परिस्थिती पाहून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यातील शाळेबाबत निर्णय घ्यावा असेही शिंदेंनी म्हटलं आहे.