‘शिंदेमुळे भाजपची प्रतिष्ठा धुळीस गेली’, शिंदे गटाच्या आमदाराने सुनावले
2024 च्या निवडणुका मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील. राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा त्यांच्या नेतृत्वात निवडून येतील. विधानसभेतही आमच्या सव्वा दोनशे जागा निवडून येईल. भाजपा, शिवसेना आणि अजित दादा गट मिळून पुन्हा सरकार बनवू असे आमदार गायकवाड म्हणाले.
बुलढाणा | 28 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडिओ भाजपच्या सोशल माध्यमावर जारी करण्यात आला. मात्र, काही वेळाने तो लगेच डिलीट करण्यात आला. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून स्वागत. शिंदेमुळे भाजपची प्रतिष्ठा धुळीस गेली, असे म्हणत शिंदे गटाला डिवचले. यावरून शिंदे गटाच्या आमदाराने संजय राऊत यांना खडे बोल सुनावले. हा आगलाव्या संजय राऊत अशी टीका आमदार संजय गायकवाड यांनी केलीय. मुख्यमंत्री करायचा असेल तर मॅजिक फिगर गाठावी लागेल. तो व्हिडिओ जुना आहे. काळजी करू नका, भाजपा शिवसेना सरकार पुन्हा येईल. भाजपच्या लोकांना देवेंद्र जर मुख्यमंत्री पाहिजे असतील तर चुकीचे काय? प्रत्येक कार्यकर्ता नेत्याप्रती स्नेहभाव ठेवताच असतो. शिंदे यांच्यामुळे भाजपची प्रतिष्ठा धुळीस नाही तर ती उंचावर गेली आहे. पण, शिवसेनेची प्रतिष्ठा संजय राऊत यांनी मातीत घातली होती अशी टीकाही आमदार गायकवाड यांनी केली.