पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी ईडी करणार
या प्रकरणाची 'ईडी'ने स्वतःहून दखल घेतली. त्यामुळे या प्रकरणातील दोषींसह घोटाळ्यातील अन्य सहभागींची नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे – जिल्ह्यातील एका शिक्षणसंस्थेतील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीने (ED)स्वतःहून दखल घेतली आहे. बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा( Teacher recruitment scams) उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलाविले आहे. येत्या दोन ऑगस्टला शिक्षक भरती घोटाळ्यात नेमक्या कोणत्या व्यक्तींचा समावेश होता, याबरोबरच अन्य प्रकरणांबाबत चौकशी करण्यात येणार आहे. शिक्षक भरतीमध्ये दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याने त्यात मनी लाँडरिंग (Money laundering)झाल्याचा संशय आहे.या प्रकरणाची ‘ईडी’ने स्वतःहून दखल घेतली. त्यामुळे या प्रकरणातील दोषींसह घोटाळ्यातील अन्य सहभागींची नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती.