सामनातून हल्लाबोल; फडणवीस यांच्या बेरजेच्या गणितावर बोट; ‘कूटनीती, बेरजेचे राजकारण…’
कूटनीती, बेरजेचे राजकारण वगैरे मुलामा देणे हे राजकारण नसून एक राष्ट्रीय संकट असल्याची टीका देखील यावेळी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
मुंबई : ठाकरे गटाचं मुखपत्र असणाऱ्या सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडताना, ‘बेरीज, कूटनीती आणि किरकोळ गोष्टी… दोन वांझ भाषणे असल्याची टीका करण्यात आली आहे. तर आयुष्यभर ज्या संस्थेत, ज्या नेत्यांबरोबर राहिलो तिला क्षणात सोडणे हा व्यभिचार आहे. तर फडणवीस अशा व्यभिचारी लोकांच्या पंक्तिला जाऊन बसले आहेत. कूटनीती, बेरजेचे राजकारण वगैरे मुलामा देणे हे राजकारण नसून एक राष्ट्रीय संकट असल्याची टीका देखील यावेळी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘हम छेडते नही, छेडा तो छोडते नही.’ असा शेर फडणवीस यांनी मारला. कार्यकर्त्यांकडून टाळ्या मिळवल्या. पण तुम्ही टाळ्या मिळवा किंवा टाळ कुटा, पण राजकारण सत्य व धर्माचे करा. ईडी, सी.बी.आय. वगैरे चिलखते बाजूला करा व नंतर ही असली संवादफेक करा अशीही टीका सामन्यातून फडणवीस यांच्यावर करण्यात आली आहे.