“भाजपचे अनेक आमदार नाराज”, एकनाथ खडसे यांनी सांगितले कारण
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणाचं समीकरण बदललं आहे. अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिवसेना आणि भाजपचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. याच घडामोडींवर शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे.
जळगाव: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणाचं समीकरण बदललं आहे. अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिवसेना आणि भाजपचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. याच घडामोडींवर शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “शिंदे गटाचे अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून मंत्रीपदासाठी उभे आहेत. अनेक आमदार स्वतःहून सांगत आहेत की, मी मंत्री होणार आहे. अशास्थितीत प्रत्येकजण मंत्रीपदासाठी इच्छूक आहे. ज्यावेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल, खातेवाटप होईल तेव्हा मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळणार आहे. आज भाजपाच्या आमदारांमध्येही नाराजी आहे, फक्त शिंदे गटाप्रमाणे बाहेर बोलत नाहीत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याने भाजपाचे अनेक आमदार नाराजी व्यक्त करत आहेत.भाजपा आमदार माझ्याशी बोलताना या निर्णयामुळे नाखूश असल्याचं मलाही सांगतात.”