महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी मुंबईतील दादर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात येते. यंदाही मनसेकडून आकर्षक विद्युत रोषणाई आणि मोठाले आकाश कंदील शिवाजी पार्क येथे लावण्यात आले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून लावण्यात आलेल्या आकाश कंदीलांवर आक्षेप घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून हा आक्षेप घेण्यात आला होता. यानंतर निवडणूक आयोगाकडून पाऊलं उचलत मनसेचे कंदील हटवण्यात आले आहे. या कंदिलांवर मनसेचं चिन्ह असल्याने ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. दरम्यान, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे मनसेच्या दिपोत्सवाविरोधात काल तक्रार दाखल केली होती. यावरच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले होते. ‘उबाठाचा हिंदू सणांना विरोध आहे. उद्या हे ईदच लायटिंग असतं, हिरवे कंदिल लागले असते, तर उबाठाने विरोध केला असता का? ‘, असा सवाल मनसेकडून करण्यात आला होता.