नागपूरच्या कॉंग्रेसच्या रॅलीला दहा हजार लोकही जमणार नाहीत, आशीष देशमुख यांची टीका
कॉंग्रेसच्या स्थापना दिवसा निमित्त विदर्भात कॉंग्रेसची महारॅली होत आहे. या रॅलीला दहा लाख लोक जमणार असल्याचा दावा केला जात आहे. यावर भाजपाचे नेते आशीष देशमुख यांनी या रॅलीला दहा हजार लोकही जमणार नसल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसकडे जनतेला देण्यासारखे काही नाही. विधानसभेतील तीन राज्यातील पराभवाने कॉंग्रेस नैराश्यात असून साल 2024 मध्ये जनता पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावरच विश्वास दाखविणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.
नागपूर | 27 डिसेंबर 2023 : विधान सभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकांत कॉंग्रेसचा झालेला पराभव, त्यामुळे आत्मविश्वास गमावलेल्या कॉंग्रेसला उद्याच्या रॅलीत दहा हजार लोकांनाही जमविता येणार नसल्याची टीका भाजपाचे नेते आशीष देशमुख यांनी केली आहे. इंडिया आघाडीला आपला पंतप्रधान पदाचा चेहरा ठरविता आलेला नाही. मल्लिकार्जून खरगे यांचे नेतृत्व स्वीकारण्यास ममता बॅनर्जी आणि केजरीवाल यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे साल 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. नागपूरचे कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा केली आहे. जिल्हा सहकारी बॅंकेच्या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नव्हती. शेतकरी सावकाराच्या जाळ्यात अडकत चालेले होते. त्यामुळे विदर्भात गेल्या 22 वर्षांत झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना कॉंग्रेसचे जबाबदार असल्याने उद्याची कॉंग्रेसची महाभ्रष्ट रॅली असल्याची टीका देशमुख यांनी केली आहे.