शिंदे-भाजप वाद पोहचला नांदेडात; बॅनर लावत शिंदे यांना डिवचण्याचा कोणाचा प्रयत्न?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याची जाहिरात आली. त्यानंतर या जाहिरातीवरून राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. आता हा वाद मुंबईच्या बोहर गेला आहे.
नांदेड : शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद राहून राहून उघड होत आहे. कल्याणमधील वाद शांत झाला तोच लोकप्रिय कोण यावरून नवा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याची जाहिरात आली. त्यानंतर या जाहिरातीवरून राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. आता हा वाद मुंबईच्या बोहर गेला आहे. शिंदे गटाच्या जाहिरातींना नांदेडमध्येही फडणवीस समर्थकांनी बॅनरबाजी करून चोख प्रत्युत्तर दिले आहे. येथे ‘50 खोके आणि 105 डोके‘, देशात नरेंद्र….राज्यात देवेंद्रच!, अशी फलकबाजी करण्यात आली आहे. अशी फलकबाजी करत शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न कोणी केला असा सवाल आता होताना दिसत आहे. तर हे बॅनर शिंदेगटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात आयटीआय कॉर्नर येथे लावण्यात आले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले. बॅनरवर फडणवीस समर्थक असा उल्लेख असला तरी, ते कोणी लावले हे समजू शकले नाही. तसेच याची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, यासंबंधी भाजप व शिंदेगटाकडून यावर सायंकाळपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. तर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे खरे असल्याचे स्पष्ट केलंय. मात्र लावलेले बॅनर हे भांडण लावणारे आणि खोडसाळपणा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.