विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांचा पंचतारांकित हॉटेलात मुक्काम

विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांचा पंचतारांकित हॉटेलात मुक्काम

| Updated on: Jul 08, 2024 | 7:28 PM

येत्या 12 जुलै रोजी विधान परिषद निवडणू होणार आहे. याच तारखेला या निवडणूकांचे निकाल देखील जाहीर होणार आहेत. या निवडणूकीत भाजपाने पाच जणांची नावे जाहीर केली आहेत. भाजपाने पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहेत. सध्याच्या 11 विधान परिषद आमदारांचा कार्यकाल येत्या 27 जुलै रोजी संपणार आहे.

येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या निवडणूका होणार आहेत. एकूण 11 पदासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एकाचा पराभव होणे अटळ आहे. तो उमेदवार नेमका कोण असणार हे मोठे रंजक ठरणार आहे. दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात विधान परिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पडले त्यानंतर लागलीच एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारच पाडले. आता पुन्हा निवडणूका होत आहेत. प्रत्येक आमदाराच्या मतांचा कोटा पक्षाच्या सदस्य संख्ये प्रमाणे पाहाता,  23 मते प्रत्येकाला निवडून येण्यासाठी प्राथमिक फेरीत पडणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार पडणार याकडे लक्ष लागले आहे. महायुतीने पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. तर शिवसेने अचानक आपला हुकूमाचा एक्का मिलिंद नार्वेकर यांना उतरविले आहे. महाविकासआघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील असे म्हटले जात आहे. परंतू शेकापचे जयंत पाटील, पंकजा मुंडे की मिलिंद नार्वेकर यापैकी कोण पडणार ? याकडे लक्ष लागले आहे. हे मतदान गुप्त मतदान असल्याने आमदारांचा टोपी फिरविण्याचा आतापर्यंतचा इतिहास पाहाता गडबड होण्याची शक्यता आहे.प्रत्येक पक्षाने आपआपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलात सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बहुजन विकास आघाडीचे हिंतेंद्र ठाकूर नेमके कोणाच्या बाजूला आहेत अशा प्रश्न पडला आहे, कारण आज त्यांनी महायुती आणि शरद पवार अशा दोन्ही नेत्यांची भेट घेतली आहे. अपक्षांना या निवडणूकीत स्वत:जवळ राखण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष पक्षाचा नेता करीत आहेत. म्हणून प्रत्येक पक्षाने आपआपल्या आमदारांना सुरक्षित जागी ठेवले आहे.

Published on: Jul 08, 2024 07:27 PM