आधी मगर बाहेर आली, आता प्राणीच चोरीला गेले, ‘त्या’ झू मध्ये नेमकं घडतंय काय?
काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क परिसरातील महात्मा गांधी जलतरण तलावामध्ये एक मगरीचे पिल्लू आढळले होते. आता याच परिसरातून काही प्राणी चोरीला गेले आहेत. यामुळे दादर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : दादरच्या शिवाजी पार्क येथील वादग्रस्त मरीन ऍक्वा झू प्राणी संग्रहालय’ येथून प्राण्यांची चोरी झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याच प्राणी संग्रहालयातून एक मगरीचे पिल्लू महात्मा गांधी जलतरण तलावात गेले होते. त्यानंतर हे झू अनधिकृत आहे. ते बंद करण्यात यावे अशी मागणी मनसेने केली होती. मनसेच्या तक्रारीनंतर पालिकेने या झू ला नोटीस पाठविली होती. मात्र, झू प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. अखेर मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी या झू वर कारवाई केली. येथील सहा अनधिकृत बांधकामे महापालिकेने निष्कासित केली. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी मरीन ऍक्वा झू प्राणी संग्रहालयामधून प्राणी चोरीला गेल्याची तक्रार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलीय. चोरीला गेलेल्या प्राण्यांमध्ये विदेशी प्रजातींचे ६ अजगर, २ घोरपडी, १ पाल आणि सरडा यांचा समावेश आहे. हे प्राणी संग्रहालय तात्पुरते बंद असणार असल्याचा फलक देखील येथे लावण्यात आला आहे.