प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरच नेत्यानं मांडली व्यथा, म्हणाला, ‘बाहेरच्यांना जवळ घेता मग…’
काँग्रेसकडून पुण्यात अशीच आढावा बैठक घेण्यात आली. मात्र यावर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा कमी आणि पदाधिकाऱ्यांची उणेधुणीच निघताना दिसली. या आढावा बैठकीदरम्यान पुणे काँग्रेस मधील वाद चव्हाट्यावर आले.
पुणे : राज्यात आता लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. भाजप-शिंदे गट युती आणि महाविकास आघाडीत यावरून बैठका होताना दिसत आहे. तर प्रत्येक पक्ष आपल्या अनुशंगाने चाचपणी आणि आढावा बैठक घेताना दिसत आहे. अशाच बैठका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून लोकसभा मतजदारसंघानिहाय घेतल्या जात आहे. काँग्रेसकडून पुण्यात अशीच आढावा बैठक घेण्यात आली. मात्र यावर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा कमी आणि पदाधिकाऱ्यांची उणिधुणीच निघताना दिसली. या आढावा बैठकीदरम्यान पुणे काँग्रेस मधील वाद चव्हाट्यावर आले. मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीतील पुण्यातील पदाधिकाऱ्यांमधला असलेला वाद उफाळून आलेला दिसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समोरच पुण्यातील काँग्रेस नेत्यांची नाराजी उघड झाली. यावेळी माजी मंत्री रमेश बागवे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. तर पक्षाच्या विरोधात काम केलेल्या लोकांना नेते जवळ करतात असा आरोप त्यांनी केला. तसेच जर बाहेरच्यांना असचं जवळ घेणार असाल तर पक्षातील जुण्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काय करायचं असा सवाल त्यांनी उपस्थित केला.