‘तर… आझाद मैदानात उपोषण करा’, शरद पवार यांना कुणी दिलं खुलं आव्हान?
शरद पवार यांनी जाणीवपूर्वक मराठ्यांच आरक्षण घालवलं. आता त्यांचे जे काही अश्रू आहेत ते मगरीचे अश्रू आहेत. त्यामुळे त्यांना खरंच आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी आझाद मैदानात उपोषणाला बसावं.
सातारा : 7 सप्टेंबर 2023 | मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात रान पेटलेलं आहे. अशातच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना खुलं आव्हान दिलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जर मराठा आरक्षणाबाबत इतके वाटत असेल तर उद्यापासुन आझाद मैदानावर उपोषण सुरु करा असं सदाभाऊ खोत म्हणालेत. पवारांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसावं. आरक्षणाच्या प्रश्नावर पवार आता मगरिचे अश्रू ढाळतायेत असा आरोप खोत यांनी केला. मराठा समाजाच्या प्रस्थापित नेत्यांनी मराठा समाजाची माती केली. २००४ साली बापट आयोग कोणी स्थापन केला. बापट आयोगानं आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं तरी हा आयोग का स्विकारला असा सवाल त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात पवारांनी मराठ्यांच आरक्षण घालवलं असा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस याची ब्राह्मण जात आहे त्यामुळेच त्यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न विरोधक करतायेत अशी टीकाही खोत यांनी केली.