काही राज्यकर्त्यांमुळे राज्यव्यवस्थेला धोका, नाना पटोले यांचा रोख कुणाकडे?
देश स्वतंत्र होऊन ५० वर्ष झाली. पण, गेल्या नऊ वर्षात संविधानाला ठेच पोहोचविण्याचे काम काही राज्यकर्ते यांच्याकडून होत आहे.
मुंबई : आजचा दिवस हा देशवासियांसाठी उत्सव साजरा करणारा दिवस आहे. देश स्वतंत्र होऊन ५० वर्ष झाली. पण, गेल्या नऊ वर्षात संविधानाला ठेच पोहोचविण्याचे काम काही राज्यकर्ते यांच्याकडून होत आहे. असे काय झाले हा प्रश्न निर्माण होत असून देशाचे संविधान वाचविणे हा आमचा संकल्प आहे, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी सांगितले.
दादर येथील टिळक भवन या कॉंग्रेस मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना देशवासियांना महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्ठाचार यासाठी लढावे लागत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकाजुर्न खर्गे यांनी आम्हाला ‘हात से हाथ जोडो’ हा संकल्प दिला आहे. त्यामुळे होणाऱ्या अत्याचाराविरोधात आम्ही आवाज बनणार आहोत. काँग्रेसचा कार्यकर्ता देशाचे संविधान वाचविण्यासाठी पुढे येणार आहे असे ते यावेळी म्हणाले.
२ तारखेला पुणे कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीची चर्चा होणार आहे. जवळपास सर्व काही झालेले आहेच पण, फॉर्मल मिटिंग होणार आहे असे त्यांनी सांगितले.