बहुमताच्या खेळावरील राऊतांच्या टोल्यावर बावनकुळेंचा सल्ला, म्हणाले…
शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. बहुमत नेहमी चंचल असतं. आज आमच्याकडे असेल तर उद्या दुसऱ्याकडे. त्यामुळे बहुमताच्या खेळावर अवलंबून राहू नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई : राज्यात आज गुढीपाडव्याचा सण आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा मेळावा आहे. त्यामुळे राज्यात गोडधौडीसह राज ठाकरे आज जाहीर भाषणात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान मनसेकडून दादरच्या शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करण्यात आली. ज्यात राज ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. बहुमत नेहमी चंचल असतं असं म्हटलं होतं. त्यावर आता राजकारण गरम होताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊत यांचा चिमटा काढला आहे.
संजय राऊत यांनी कधीतरी सरकारला चांगले सल्ले द्यावे, कधीतरी चांगलं बोललं पाहिजे. चांगल्या सूचना दिल्या तर सरकारही ऐकेल असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
दादर येथे मनसेकडून करण्यात आलेल्या पोस्टरबाजीवर बोलताना राऊत यांनी, देशात लोकशाही आहे. सामान्यही नागरिक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. तुमच्याकडे बहुमत असेल तर तुम्ही त्या पदावर जाऊ शकता. शेवटी हा आकड्यांचा खेळ आहे. बहुमत नेहमी चंचल असतं. आज आमच्याकडे असेल तर उद्या दुसऱ्याकडे. त्यामुळे बहुमताच्या खेळावर अवलंबून राहू नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.