आमच्या 17 हजार कार्यकर्त्यावर सरकारने केसेस टाकल्या, त्यामुळेच…; मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
गुढीपाडव्याला दिलेल्या भाषणात राज ठाकरेंनी रामनवमी आणि हनुमान जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचे आवाहन केले होते. हिंदूंचे सण मोठ्या प्रमाणावर साजरे करणे गरजेचे झाले आहे, असा संदेश राज ठाकरे यांनी हिंदूंना दिला होता
मुंबई : हनुमान जयंतीनिमित्त राज्याच्या काणोकोपऱ्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी राजकीय कार्यक्रम होत आहे. अमरावतीत देखील खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असाच कार्यक्रम मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ही करण्यात आला आहे. मनसेकडून हनुमान जयंतीनिमित्त महाआरती व हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले. दादरच्या मारुती मंदिरात ही महाआरती करण्यात आली. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
त्यांनी, गेल्या वर्षी हनुमान जयंतीला आम्ही भोंग्याचे आंदोलन केले होते. त्यावेळी असणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या होत्या. हनुमान चालीसा पठणाला विरोध केला होता. त्यामुळे ते सरकार गेल्याची टीका देशपांडे यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे.