मुंबई ते नाशिक महामार्गाची झाली अक्षरश: चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
जोरदार पर्जन्यवृष्टीने मुंबई ते नाशिक मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावरील खड्डे चुकवित वाहनांना प्रवास करावा लागत असल्याने अपघात घडण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबई सह राज्यात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु असून मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. जून महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाने जूलैमध्ये कहर केला आहे. पुणे जिल्ह्यासह रायगड, मुंबई ठाणे कोकण या भागाला पावसाने अक्षरश: झोडपले आहे. पावसाने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक घरात पाणी गेले असून पुण्यात वीजेचा शॉक लागून तिघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या पावसाने अनेक अपघात घडले आहे. मुंबई ते नाशिक महामार्गाची तर पावसाने अगदी चाळण झाली आहे. या महामार्गावर वाडीवरे गावात रस्ता चिखल आणि खड्ड्यांनी भरलेला आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. मुंबई ते नाशिक महामार्गावरील महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे यांनी ठाण्यात घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे. जर रस्ता दुरुस्त केला गेला नाही तर राजीनामे द्या अशा शब्दात भुसे यांनी अधिकाऱ्यांना दम दिला आहे.