मी कॉंग्रेसमध्येच आहे, कुठेही जात नाही, झिशान सिद्दीकी यांचे स्पष्टीकरण
कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांनी कॉंग्रेसला सोडचिट्टी दिल्यानंतर अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांचा मुलगा झिशान सिद्धीकी यांनी मात्र आपण कॉंग्रेसमध्येच रहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र आघाडीचे सरकार असताना शिवसेने आपल्यावर खूप अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेमुळे कॉंग्रेसचे खूप नुकसान होत असल्याचे झिशान यांनी म्हटले आहे.
मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : कॉंग्रेसचा मुंबईतील मुस्लीम चेहरा असलेले माजी मंत्री, वांद्रे पश्चिमचे आमदार बाबा सिद्धीकी यांनी अखेर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित गटात प्रवेश केला. त्यांनी नुकताच कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. याआधी दक्षिण मुंबईतील कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला सोडचिट्टी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. बाबा सिद्धीकी यांचे पूत्र तरुण नेते झिशान बाबा सिद्धीकी यांनी मात्र आपण कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचे म्हटले आहे. आपण आपले पिताश्री बाबा सिद्धीकी यांना शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपला कॉंग्रेसमध्ये रहाण्याचा विचार आहे. आपण काही टर्म संपण्याची वाट पाहातोय असा विचार करु नका असे त्यांनी म्हटले आहे. आघाडीत असताना शिवसेनेचे सरकार असताना आपल्या शेजारी सरकारचे कार्यक्रम व्हायचे परंतू आपल्या साधे आमंत्रण नसायचे अशी तक्रार त्यांनी केली. आमदार निधीतही अन्याय झाला होता. आपण ही बाब नेहमीच वरिष्ठांच्या कानावर घातल्याचे आमदार झिशान सिद्धीकी यांनी सांगितले.