‘वेळ कशी कोणावर येते…,’ क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
मुंबई महानगर पालिकेने उद्यानासाठी राखीव ठेवलेला 500 कोटी रुपयांचा भूखंड रवींद्र वायकर यांनी लाटल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. या प्रकरणात आर्थिक गु्न्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टिका केली आहे. त्यास खासदार रवींद्र वायकर यांनी उत्तर दिले आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रवींद्र वायकर यांच्या वरील पाचशे कोटी रुपयांच्या कथित हॉटेल भूखंड घोटाळ्याची चौकशी बंद करावी असा क्लोजर रिपोर्ट कोर्टात फाईल केला आहे. त्यामुळे महायुतीत सामील झाल्याचे फळ रवींद्र वायकर यांनी लागलीच मिळाल्याचे बोलले जात आहे. भाजपवाले आता दाऊदला इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचे शिल्लक राहीले आहेत अशी जोरदार टिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावर रवींद्र वायकर यांनी राऊत यांना जे बोलायचे आहे त्याबद्दल मी काय बोलू ते काहीही बोलायला मोकळे आहेत. वेळ कशी कोणावर येते हे सांगू शकत नाही असेही वायकर यांनी म्हटले आहे. मला सर्वोच्च न्यायालयातून आधीच क्लिन चिट मिळाली होती असाही दावा रवींद्र वायकर यांनी केला आहे. वायकर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवाराने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला आव्हान दिले आहे, त्याबद्दल विचारता त्यांनी देशाच्या सर्वोच्च नेत्या राष्ट्रपती मुर्मू यांनी देखील ईव्हीएममध्ये छेडछाड करता येत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हे आरोप करणारे कोण असा उलट सवाल केला आहे.