सगळेच पात्र ठरले तर अपात्रतेची केस केलीच कशाला ? सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रीया
महाराष्ट्राच्या अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा गट हाच खरा शिवसेना पक्ष आहे असा निकाल दिला आहे. हा निकाल म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असा असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
मुंबई | 10 जानेवारी 2024 : सत्तासंघर्षाचा निकाल अखेर लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निकाल दिला आहे. या निकालावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची थोर परंपरा आहे. परंतू राहुल नार्वेकर यांनी हि प्रतिष्ठा धुळीस मिळविली आहे. हा निकाल म्हणजे खोदा पहाड निकाला चुहा आहे. जर सगळेच आमदार पात्र ठरले तर अपात्रते विरोधातील याचिकेचे काय झाले ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांनी स्थापन केला आणि ते हयातीत असतानाच त्यांनी तो आपले पुत्र उद्धव ठाकरे यांच्या स्वाधीन केला. हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.