‘तुम्ही देखील कुणाच्या तरी आशीर्वादाने मंत्री झालात’; सदाभाऊ खोत यांना एकनाथ खडसे यांचा टोला
त्यांनी पवारांना ‘सैतान’ म्हणून संबोधले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. तर त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेत खोत यांच्यावर टीका केली.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर रयत क्रांती सेनेचे प्रमुख, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यांनी पवारांना ‘सैतान’ म्हणून संबोधले होते. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. तर त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेत खोत यांच्यावर टीका केली. याच टीकेवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना अलीकडच्या काळात राजकारणाचा दर्जा घसरल्याचं म्हटलं आहे. तर बहुतांशी पक्षांनी आपली पातळी सोडून दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तर पातळी सोडून बोलल्याने जनमानसात याबाबत चीड निर्माण झाल्याचे देखील ते म्हणाले आहे. तर कोणी कुणाला सैतान म्हणतात तर कुणी पप्पू म्हणतं. तर यावेळी खोत यांनी शरद पवारांबाबत सैतान असा उल्लेख केल्याचा निषेध देखील व्यक्त केला आहे. शरद पवारांनी अनेकांना घडवलं, मंत्रिपदापर्यंत नेलं, त्यांची कारकीर्द आणि राजकीय उंची पाहता त्यांच्याबाबत सैतान असा शब्दप्रयोग करणे चुकीचे आहे. सदाभाऊ खोत देखील कुणाच्या तरी आशीर्वादाने मंत्री झाले होते असाही टोला खडसे यांनी हाणला आहे.