मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या खासदाराची ‘या’ नेत्यानं लायकीच काढली; म्हणाला, ‘लायकी नाही’
शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार अनिल बोंडे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच टीका केली. बोंडे म्हणाले, “खरं म्हणजे आपल्या विदर्भात एक म्हण आहे. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती बनत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत.
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमधला वाद आता जाहिरातीतूनही जनतेच्या समोर येत आहे. त्यावरूनच विरोधकांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत हे भाजपला मान्य आहे का असा सवाल केला आहे.
त्याचदरम्यान शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार अनिल बोंडे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच टीका केली. बोंडे म्हणाले, “खरं म्हणजे आपल्या विदर्भात एक म्हण आहे. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती बनत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीसह सर्व जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे. पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असतील, असं मला वाटतंय. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीये.” यावरून आता वाद पेटला आहे.
याचवादावरून युतीतील मित्र पक्ष प्रहारचे अध्यक्ष तथा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपा खासदार अनिल बोंडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बेडूक म्हणत असाल तर त्याचा निषेध देखील करतो. बेडूक म्हणायचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. एकनाथ शिंदे यांना बेडूक म्हणत असाल तर, शिंदेंशिवाय तुम्ही फुगले नसता. मंत्री होऊन सभागृहात पाऊल ठेवला नसता. वेळ आली तर आम्ही तसं उत्तर देखील देऊ’, अशा शब्दांत बोंडे यांना सुनावलं आहे.