माझ्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांवर बोला, अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटाला इशारा
माझी कुठे साखर कारखाना नाही, कुठल्या कारखान्यावर ईडी चौकशी नाहीए, माझं प्रोफेशन अभिनयाचे असल्याने माझी वेळेची ओढाताण होतेय हे खरंच आहे असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत बसलेले आपलं वजन वापरणार का ? आणि प्रश्न न सुटल्यास आपली खुर्ची सोडणार का ? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.
पुणे | 28 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चावर अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी टीका केली आहे. मंत्र्यांनी आमच्या मोर्चावर किंवा वैयक्तिक माझ्यावर टीका करण्यापेक्षा कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी आपले वजन वापरावे असे आव्हान खासदार अमोल कोल्हे यांनी दिले आहे. सेलिब्रिटी पहिल्यांदा निवडून येतात. परंतू नंतर मात्र त्यांचा राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे लोकांची तक्रारी वाढतात अशी टीका मंत्री अनिल पाटील यांनी केली होती. त्यावर अमोल कोल्हे यांनी पहिल्याच टर्ममध्ये दोनदा संसद पुरस्कार असेल, पहिल्याच निवडून आलेल्या टर्ममध्ये देशातील एकूण निवडून आलेल्या खासदारांच्या क्रमवारीत तिसरा क्रमांक असेल, बैल शर्यतीसाठी केलेली मांडणी, नॅशनल हायवेच्या माध्यमातून साडे एकोणीशे हजार कोटी रुपये आणणे असेल, इंद्रायणी मेडीसिटी असेल हे सगळे प्रकल्प मी जर कुठे कमी पडत असेल तर अनिल पाटील यांनी मार्गदर्शन करावे असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.