आम्ही कदापी भाजप बरोबर जाणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने सर्व चर्चांना लावला ब्रेक
राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत किती दिवस राहील ते माहीत नाही. भाजपबरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला होता.
निपाणी : कर्नाटक निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. राज्यातून अनेक नेते त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी सध्या बेळगावसह सीमाभात गेले आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचार करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखिल निपाणीमध्ये गेले. यावेळी त्यांनी जाहीर सभा घेत पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत किती दिवस राहील ते माहीत नाही. भाजपबरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला होता. त्यावक्तव्याचा समाचार घेताना जयंत पाटील यांनी, 1999 सालापासून आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात कायम एकत्रीत राहिले आहेत. भले निवडणूक कदाचित वेगळ्या लढल्या तरी पुन्हा एकत्रित तेच आलेले आहेत. आम्ही कधी भारतीय जनता पक्षावरून गेलेलो नाही आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य हे फक्त सीमा भागातल्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी होतं. तर आमचा पक्ष कदापी भाजप बरोबर जाणार नाही, असं स्पष्ट त्यांनी सांगत या अफवांना ब्रेक लावला आहे.