बेळगावात काँग्रेसची सभा उधळवली, सभेत भगवे ध्वज घेऊन मराठी भाषिक घुसले; नेमकं काय झालं?
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा बेळगावात उधळून लावण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावल्याचे बोलले जात आहे
बेळगाव : कर्नाटकमध्ये सध्या कर्नाटक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. अशातच आता बेळगावमधून मोठी बातमी आली असून काँग्रेसची जाहिर सभा उधळण्यात आली आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा बेळगावात उधळून लावण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावल्याचे बोलले जात आहे. बेळगाव जवळच्या देसूर गावात आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेस उमेदवारासाठी सभा होती. या जाहीर सभेत भगवे ध्वज घेऊन मराठी भाषिक घुसले. यावेळी घोषणा देत कार्यकर्त्यांनी सभा उधळून लावली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभातील घडामोडींना वेग आला आहे. बेळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे. कर्नाटकातील निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे देखील उमदेवार निवडणूक लढवत आहेत. असं असताना महाराष्ट्रातील नेते काँग्रेस आणि इतर पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात जात असल्याने काही मराठी भाषिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. यातूनच बेळगावात प्रणिती शिंदे यांच्या सभेत गदारोळ झाला.